महाराष्ट्रातील दागिन्यांची माहिती

Tanmani - तन्मणी

हा गळ्यामध्ये घालण्याचा मोत्यांचा खास पेशवाई दागिना आहे. मोत्यांच्या अनेक सरीना अडकवलेला एक मोठा खडा व अनेक खडयांचे आणि कच्च्या (पैलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे खोड. कधी कधी हे खोड मोत्यांच्या सरीऐवजी रेशमाच्या धाग्यातही गुंफलेले असते.  मधे जे पदक असतं त्याला तन्मणीचं खोड म्हणतात. या खोडाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.

 Kolhapuri Saaj - कोल्हापुरी साज   

 लाखेवर सोन्याचा पत्रा मढवलेला हा दागिना असतो. कोल्हापुरी साजमध्ये 'जवमणी' आणि 'पानड्या' (वेगवेगळ्या आकाराची पाने) सोन्याच्या तारेने गुंफलेली असतात.या साजात २१ पाने असून त्यांपैकी १० पाने हे भगवान विष्णूचे अवतार, ८ पानांचं एक अष्टमंडल, १ पान माणिक आणि एक पाचूच , ते लाल किंवा गुलाबी रंगाचे असते. हा दागिना ६० वर्षांपासून प्रसिद्ध आहे.

Bakuli Haarबकुळी हार

हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना आहे. बकुळी हारामध्ये बकुळीच्या नाजुक फुला सारखीच दिसणारी फुलं असतात. एक,दोन, तीन पदरात घडवला जाणारा हा दागिना म्हणजे बकुळीहार '.

Bormalबोरमाळ

हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे.लहान बोराच्या आकाराच्या मण्यांची माळ म्हणजे बोरमाळ. गोल गरगरीत मण्यांसोबतच लांबट चौकोनी मण्यांचीहि बोरमाळ बनवली जाते.पातळ पत्र्याचे मणी बनवून आत लाख भरली जाते. त्यामुळे कमी वजनात बनणारा  पण ठसठशीत दिसणारा हा दागिना तयार होतो.पूर्वी एकपदरी माळ घालायच्या , पण आता दोनपदरी आणि तीनपदरी बोरमाळांचीही खास चलती आहे.

Mohanmal - मोहनमाळ

हा दागिना सर्वसाधारणपणे आज्जीकडून येणारा खास मराठमोळा दागिना आहे.एका तारेने एकाला एक जोडलेले हरभऱ्याएवढ्या सोन्याचे मणी म्हणजे मोहनमाळ.हा एक, दोन,तीन किंवा त्यापेक्षा अधिक पदरांमधे असतो. स्त्रिया गळ्यात घालत असलेला सुंदर , मन मोहून टाकणारा अलंकार. 

Putli Haar -पुतळी हार

हा महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. गोल चपटया नाण्यावर लक्ष्मीची छाप किंवा ठसा असणा-या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी माळ म्हणतात.पुतळया या सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत. 

Jondhal Poth - जोंधळी पोत

जोंधळी मणी हे ज्वारीच्या बियाप्रमाणे दिसतात. जोंधळय़ाच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे छोटे आकाराचे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ ‘जोंधळी पोत’ या नावाने ओळखली जाते. जोंधळी मणी एका दोऱ्यामध्ये ओवले जातात.अशाप्रकारे दोन,तीन किंवा त्यापेक्षा अधिक ओवलेल्या मण्यांचे पदर एकत्र करून गळयामध्ये परिधान करणारा अलंकार.

Belpantik - बेलपानटिक

महाराष्ट्रातला एक पारंपरिक दागिना. बेलपानाच्या आकारा प्रमाणे तीन पानं असलेल्या सोन्याच्या पेट्यां, याला खालून रेशमी धाग्यांची मऊ गादी केलेली असते.वज्रटीकेसारखा गळ्यालगत बसणारा अलंकार.

Chitang - चित्तांग

हा मूळचा कर्नाटकातील दागिना आहे. महाराष्ट्रात चिंताक या मूळ शब्दाऐवजी चित्तांग या नावाने तो ओळखला जात असे. गोलाकार आणि सुमारे 1 किंवा 1.5  cm सपाट पट्टी जी पुढे फासाने जोडलेली असतं असा हा गळय़ात अडकवण्याचा दागिना म्हणजे चितांग . लहान मुलांच्या मनगटामधल्या ‘बिंदल्या’प्रमाणेच परंतु मोठय़ा आकाराचा असा हा गळय़ात अडकवण्याचा दागिना होता. ‘सुवर्ण नियंत्रण कायदा’ अमलात येण्यापूर्वी (१९६२) हा दागिना येथे पुष्कळ ठिकाणी दिसत असे. आता मात्र तो पूर्णपणे लुप्त झाला आहे.